लांडगा आणि गाढव


1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (No Ratings Yet)
Loading ... Loading ...

एकदा सगळे लांडगे एकत्र होऊन त्यांनी एकमताने आपल्यातल्या एका लांडग्याला आपले नेतृत्व दिले. तो लांडगा मोठा लबाड, आपमतलबी व गोडबोल्या होता. त्याने दुसरे दिवशी आपल्या सगळ्या जातवाल्यांची एक मोठी सभा भरविली व त्यांना उपदेश केला, ‘मित्रहो ! आपले सर्वांचे हित जिच्यावर अवलंबून आहे अशी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावी, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन मी आज ही सभा भरवीत आहे. ती गोष्ट म्हणजे ‘स्वार्थ त्याग’ एकमेकांविषयीची बंधुत्वाची भावना वाढवून सार्वजनिक हित साध्य करून देणारा स्वार्थत्यागासारखा सद्‌गुण दुसरा नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवून, शिकारीत जे काय तुम्हाला मिळेल, ते खाण्यापूर्वी आपल्या एखाद्या भुकेलेल्या जातिबांधवाला त्यातला थोडा तरी भाग द्यायला तुम्ही विसरू नका.’ हे भाषण ऐकून जवळच असलेला एक गाढव त्या लांडग्याला म्हणाला, ‘शाबास, शाबास ! किती सुंदर उपदेश हा ! इतरांनी मात्र आपल्या अन्नाचा भाग आपल्या जातिबांधवांना दिला पाहिजे, आणि लांडगेदादा तुम्ही स्वतः मात्र काल आपल्या गुहेत लपवून ठेवलेली ती लठ्ठ मेंढी एकटेच खाणार ना ? शाबास, शाबास ! याचं नाव स्वार्थत्याग !’

तात्पर्य – जी गोष्ट आपण दुसर्‍याला सांगतो, तिच्या सर्वस्वी विरुद्ध असे आचरण जर आपण करू लागलो तर एखादा स्पष्टवक्ता चारचौघांत आपला उपहास करण्यास चुकणार नाही.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
None found.

Leave a Reply

Required fields are marked *.