बालगीते

आई व्हावी मुलगी माझी …

आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई

नको बोलणी खारट, आंबट, विटले विटले बाई

सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी

आंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिक्केकाई

’केस कोरडे कर ग पोरी’, सात हात त्या जटा विंचरी

’नको पावडर दवडू बाई’, कोकलते ही आई

शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी

लहान भावादेखत अगदी कान पकडते बाई

गीत – ग. दि. माडगूळकर

Incoming search terms:

  • बालगीते
  • बाल साहित्य
  • बाल साहित्य कथा
बालगीते

हासरा, नाचरा…

हासरा, नाचरा

जरासा लाजरा

सुंदर साजरा

श्रावण आला.

तांबूस कोमल

पाउले टाकीत

भिजल्या मातीत

श्रावण आला.

घुमटी लावत

सोनेरी निशाणे

आकाश वाटेने

श्रावण आला.

नौकांच्या संगती

खेळत लाटांशी

झिम्‌झिम् धारांशी

श्रावण आला.

लपत छपत

हिरव्या रानात

केशर शिंपीत

श्रावण आला.

इंद्रधनुष्याच्या

बांधीत कमानी

संध्येच्या गगनी

श्रावण आला.

लपे ढगामागे

धावे माळावर

असा खेळकर

श्रावण आला.

सृष्‍टीत सुखाची

करीत पेरणी

आनंदाचा धनी

श्रावण आला.

बालगीते

वार्‍याच्या पाठीवर…

वार्‍याच्या पाठीवर

मेघांची पालखी,

पालखीत धारांची

राणी नवखी.

सूंऽ सूंऽ फुंके

वारा तुतारी,

आनंदाने फुलून

कळक वाजवे बासरी.

झाडांचे नाच

वेलींचे कथ्थक,

पाचोळ्यांचे घोडे

नाचती थयथक.

पावसाच्या राणीने

झुकून पाहिले,

मोहनमाळेतील

मोतीच ओघळले.

बालगीते

गोड गोजरी, लाज लाजरी ताईच होणार नवरी…

गोड गोजरी, लाज लाजरी ताईच होणार नवरी

फुलाफुलांच्या बांधुन माळा मंडप घाला ग दारी

करकमलाच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे

हळदीहुनही पिवळा बाई रंग तुला तो साजे

अंगणी फुगडी नाचे,

रूप पाहुनी तुझे, साद घाली मणी मंगळ सरी

भरजरीचा शालू नेसुनी, जाई, ताई आमुची गौरी

लग्न-मंडपी तिच्या समोरी, उभी तिकडची स्वारी

अंतरपाट धरी, शिवा पार्वती वरी, लाडकी ही जाई ताई दुरी

गीत – पी. सावळाराम

बालगीते

समर्थ आहे भारतभूमी…

समर्थ आहे भारतभूमी, समर्थ सेनादळे

’सदैव असतो जय सत्याचा’ इतुके आम्हां कळे

लोकशाहिचे सदा समर्थक, आम्ही भारतवासी

शांतिप्रिय जन, स्नेह आमुचा सार्‍या जगताशी

हुकुमशाहिशी मात्र मित्रता मुळी न आम्हां जुळे

स्वातंत्र्यास्तव लढती, त्यांचे आम्ही पाठीराखे

चळे न अमुची निष्‍ठा, अरिच्या शस्‍त्राच्या धाके

अन्यायाची उखडून काढू, छाया, पाळे-मुळे

नसे कुणाशी वैर आमुचे, नको दुजी भूमी

तत्‍त्‍वासाठी साहाय्य होतो, दुबळ्यांच्या कामी

निरापराध्या होता पीडा, हृदय आमुचे जळे

विजयी सेना, विजयी जनता, विजयी जननेते

तरी न आम्ही, कधी आक्रमक कोणाचे जेते

समान सारे देश आम्हांला, सारी मानवकुळे