मित्रभेद

पंचतंत्र-गोष्ट दुसरी

‘नसती उठाठेव जो करी, तो संकटाला आपणहून पाचारी’

‘एका नगरात सीमेवरील उपवनात एक धनिक मंदिर बांधून घेत होता. त्या कामावर असलेले सुतार, गवंडी आदि कामगार, सूर्य डोक्यावर येताच काम थांबवून आपापल्या घरी जेवायला जात.

एकदा त्या मंदिराच्या तुळया तयार करण्याकरिता सुतार अर्जुनवृक्षाचे एक जाड व लांब लाकूड करवतीने चिरत होते. ते लाकूड अर्धवट चिरून होते न होते, तोच उन्हे उभावल्यामुळे सुतार त्या अर्धवट चिरलेल्या लाकडात खैराची पाचर ठोकून, इतर कामगारांसंगे जेवायला घरी गेले. ते घरी गेले आणि लगेच पाच-पंचवीस वानरांचे एक टोळके त्या ठिकाणी येऊन नाना तर्‍हेच्या चेष्टा, चाळे करू लागले.

कुणी दगडांच्या राशीतले दगड फेकतोय, तर कुणी हातोड्याने ठाकठोक करतोय, असे त्यांचे चाळे सुरू झाले असता, नसते उपद्‌व्याप करण्याची खोड असलेला एक जाडगेला वानर त्या अर्धवट चिरलेल्या लाकडावर जाऊन बसला, व त्या चिरलेल्या भागात सुताराने ठोकलेली पाचर ओढून काढू लागला. असे करीत असता, त्याची शेपटी, वृषण आदि अवयव अजाणता त्या दुभंगलेल्या लाकडाच्या फटीत गेले आणि ती पाचर काढली जाताच ते लाकडाचे दोन भाग एकदम एकत्र आल्याने त्यांत ते अवयव चिरडले गेले व त्याला यातना सोशीत प्राणांना मुकावे लागले. म्हणून मी म्हणतो, ‘हे दमनका, तू नसत्या उठाठेवीत पडू नकोस.’

यावर दमनक नाक मुरडून म्हणाला, ‘दादा, मग काय आपण आपलं पुढलं आयुष्य केवळ स्वतःचं पोट भरण्यातच घालवायचं ? छे छे ! आज जरी आपल्याला राजाश्रय नसला, तरि मित्रांना वर आणण्याकरिता व शत्रूंना खाली दडपण्याकरिता आपण पुन्हा राजाश्रय मिळवलाच पाहिजे. सध्याच्या आपल्या चैतन्यहीन आयुष्याला काहीतरी अर्थ आहे का ? म्हटलंच आहे ना ? -

यस्मिन जीवति जीवन्ति बहवः सोऽत्र जीवति ।

वायाम्सि किं न किर्वन्ति चंच्वा स्वोदरपूरणम् ॥

(ज्याच्या जगण्यामुळे या जगात अनेकजण जगतात, तोच खर्‍या अर्थी जगतो. नाहीतर कावळेसुद्धा आपल्या चोचीने स्वतःचे पोट भरतातच ना ?)

‘तेव्हा दादा, मी पिंगलकमहाराजांकडे जाणार आणि त्यांना त्यांच्या भीतीचे कारण विचारून व शक्य झाल्यास ते कारण दूर करून, त्यांचे व आपले दुरावलेले संबंध पुन्हा जोडणार.’

करटकाने विचारले, ‘पण दमनका, बोलावले नसतानाही जो राजाकडे जातो, तो बर्‍याच वेळा इतरांच्या कुचेष्टेचा विषय होतो, हे तुला ठाऊक आहे ना ?’

दमनक म्हणाला, ‘दादा, नसत्या अभिमानाला बळी पडून जे लोक राजापासून दूर राहतात ते आयुष्यभर अर्धपोटी राहतात. ज्याप्रमाणे चंदनवृक्ष हा मलय पर्वताखेरीज इतरत्र कुठे वाढत नाही, त्याचप्रमाणे विद्वान, गुणवान्, कलावंत व शूर यांच्या गुणांचे चीज राजाच्या आश्रयाखेरीज होत नाही. आता तू विचारशील की, आपण कुठे तसे मोठे आहोत ? पण आपण जरी सामान्य असलो, तरीही राजाच्या आश्रयाला जावे. कारण म्हटलेच आहे ना ?

आसन्नमेव नृपतिर्भजते मनुष्यं ।

विद्याविहीनमकुलीनमसंस्कृतं वा ।

प्रायेण भूमिपतयः प्रमदा लताश्च ।

यत्पार्श्वतो भवति तत्परिवेष्टयन्ति ॥

(जो मनुष्य जवळपास असतो, तो जरी विद्याहीन, अकुलीन किंवा असंस्कृत असला, तरी राजा त्याच्यावर कृपा करतो. राजे, स्त्रिया व वेली या बहुधा जो जवळ असतो त्याचाच आधार घेतात.)

याप्रमाणे बोलून दमनक हा जेव्हा पिंगलकाकडे गेला व त्याला म्दन करून त्याच्यापुढे नम्रपणे उभा राहिला, तेव्हा पिंगलकाने त्याला विचारले, ‘काय रे दमनका, तू बर्‍याच दिवसांत माझ्याकडे फिरकला कसा काय नाहीस ?’

दमनक म्हणाला, ‘महाराज, आपल्याला जर आमच्यासारख्या सामान्यांची गरज उरली नाही, तर उगाच यायचे कशाला ? पण एक गोष्ट मात्र निश्चित – आपण आम्हाला विचारा वा न विचारा, आमचे आपल्यावरचे प्रेम कधी कमी व्हायचे नाही, आणि आम्हाला जे योग्य वाटेल ते आपल्यासमोर बोलायला आम्ही कचरणारही नाही.’

‘त्यातून महाराज, राजा जर सेवकावर प्रसन्न झाला, तर तो फार तर त्याला कमीअधिक धन देतो, पण निष्ठावंत सेवक जर राजावर प्रसन्न झाला, तर तो त्याच्यासाठी आपला प्राणही द्यायला तयार होतो. आता इतर मंत्र्यांच्या तुलनेत मी व माझा भाऊ करटक आपल्याला यःकश्चित् वाटत असलो, तरीही आपण माझे म्हणणे ऐकून घ्यावे.’

‘महाराज, यःकश्चित् गोष्टींकडेसुद्धा दुर्लक्ष करू नये. त्यासुद्धा वाटतात तशा निरुपयोगी नसतात. साध्या काडीचासुद्धा दात व कान कोरण्यासाठी उपयोग होतोच ना ? मौल्यवान रेशीम यःकश्चित् किड्यांपासूनच मिळते ना ? प्रत्यक्ष देवसुद्धा ज्यांना मस्तकी धारण करतात, ती कमळे चिखलापासूनच मिळतात ना ? सोनेसुद्धा दगड मातीतूनच प्राप्त होते ना ? तेव्हा भोवतालच्या लोकांचे नुसते कूळ वा बुद्धी विचारात न घेता, त्यांची निष्ठाच अधिक विचारात घ्यावी. तेव्हा, आम्हा दोघां भावांसारखे मर्यादित बुद्धीचे पण अमर्याद निष्ठेचे सेवकच आपल्याला अधिक उपयोगी पडतील, ही गोष्ट महाराजांनी लक्षात असू द्यावी, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे.’

पिंगलक हसून म्हणाला, ‘दमनका, तुझे आताचे बोलणेच मुळी तू सामान्य बुद्धीचा नाहीस हे सिद्ध करते. त्यातून तू व तुझा भाऊ करटक हे माझ्या एकेकाळच्या मंत्र्याचे मुलगे, तेव्हा मी तुम्हा दोघांना तसे परके कसे मानीन ? पण या घडीला त्या इतर गोष्टी बाजूला ठेवून, तू माझ्याकडे कशासाठी आला आहेस, तेवढेच मला सांग.’

दमनक म्हणाला, ‘काही गोष्टी सर्वांसमक्ष बोलायच्या नसतात.’ त्याचे हे बोलणे ऐकून राजा पिंगलकाभोवती असलेले सर्व प्राणी दूर जाताच दमनकाने विचारले, ‘महाराज, आपण पाणी पिण्याच्या उद्देशाने यमुनाकाठी गेला असता, पाणी न पिताच काहीशा भयभीत मनःस्थितीत इकडे का परतलात?’

सुरुवातीला थोडेसे आढेवेढे घेऊन राजा पिंगलक म्हणाला, ‘दमनका, मी सांगतो आहे त्याची कुठे वाच्यता करू नकोस. अरे, मी यमुनेवर पाणी प्यायला गेलो असता, काळजाचा थरकाप उडवणारी एक डरकाळी माझ्या कानी पडली. ती ऐकून, ती एखाद्या, महाभयंकर प्राण्याची असावी, असे वाटून मी पाणी न पिताच इकडे परतलो व हे रान सोडून दुसर्‍या एखाद्या दूरच्या रानात जाण्यचा विचार मी करू लागलो.’

यावर दमनक म्हणाला, ‘महाराज, नुसत्या मोठ्या आवाजामुळे धास्तावून जाणे योग्य नाही. तसा मोठा आवाज नगारा, नौबत किंवा शंख यांचाही होतो. अशाच एका नगार्‍याच्या आवाजाला भ्यायलेल्या आमच्या एका जातभाईचे, नंतर कसे डोळे उघडले, ती गोष्ट आपल्याला ठाऊक आहे का?’ पिंगलकाने नाही असे उत्तर देताच दमनक म्हणाला, ‘तर मग ऐका महाराज-

Incoming search terms:

  • sms2life com/marathi/category/marathi-katha/tatparya-katha
मित्रभेद

पंचतंत्र-गोष्ट तेवीसावी

सूज्ञ शत्रू परवडे, पण मूर्ख मित्र महाग पडे.

एका गावात एक ब्राह्मण राहात होता. तसा तो चांगला विद्वान होता. पण कुठल्या पूर्वजाचा अवगुण त्याच्या स्वभावात उतरला न कळे – त्याला मधूनच केव्हातरी चोरी करण्याची हुक्की येई.

एकदा त्या गावात चार ब्राह्मण व्यापारी आले. त्यांनी आपल्याबरोबर आणलेला सर्वच्या सर्व माल भराभर विकला गेल्यामुळे, त्यांच्यापाशी बराच पैसा जमा झाला. ते गावात आल्यापासून त्या विद्वान पण चोरट्या ब्राह्मणाची त्यांच्यावर बारीक नजर होती. त्यांच्याजवळच्या पैशांची चोरी करण्यासाठी त्याने त्यांची ओळख करून घेतली व त्यांना सुंदर सुंदर संस्कृत सुभाषिते सुनावून, त्यांच्यावर आपली छाप पाडली. पण ते व्यापारी धूर्त व सावध असल्यामूळे त्यांच्याजवळच्या पैशांची चोरी करणे त्या ब्राह्मणाला अशक्य झाले.

त्यातून त्या व्यापार्‍यांच्या मनात विचार आला, ‘आपल्याजवळचा पैसा जर आपण आहे तसाच घेऊन गावी जाऊ लागलो, तर वाटेत चोरदरवडेखोर आपल्याला लुटतील.’ मनात असा विचार आल्याने त्या चौघांनीही आपापल्या पैशांची मौल्यवान् रत्‍ने खरेदी केली आणि आपल्या मांड्या चिरून ती त्यांत दडवून ठेवली. मग कापलेल्या मांड्या शिवून होताच, त्यांनी आपल्या गावी परतण्याच्या दृष्टीने सावरासावर सुरू केली.

हा सर्व प्रकार त्या चोरट्या ब्राह्मणाने पाहिला आणि तो स्वतःशी म्हणाला, ‘या व्यापार्‍यांना जर असेच जाऊ दिले, तर आयती आलेली सुवर्णसंधी आपण कायमची गमावून बसू. त्यापेक्षा यांच्याशी असेच गोडगोड बोलून यांनी आपल्यालाही त्यांच्याबरोबर न्यावे, यासाठी त्यांना विनंती करावी आणि त्याप्रमाणे त्यांच्यासंगे जात असता, वाटेत या चौघांनाही विष घालून यांच्या मांड्यात दडवलेली रत्‍ने आपण काढून घ्यावीत.’

मनात असे ठरवून तो चोरटा ब्राह्मण त्यांना म्हणाला, ‘शेटजी, तुमच्या थोड्याशा सहवासानेदेखील तुमच्यावर माझा एवढा जीव जडला आहे की, यापुढे तुमच्याशिवाय राहाणे मला शक्य होणार नाही. तेव्हा तुम्ही मलाही तुमच्यासंगे तुमच्या गावाला न्या.’

त्या व्यापार्‍यांनी त्याचे म्हणणे मान्य केले आणि ते त्याला घेऊन आपल्या गावाचा रस्ता चालू लागले.

पण वाटेत एक आक्रित घडले. ‘पल्लीपूर’ या भिल्लांच्या गावामधून ते जात असता, झाडांवर बसलेले कावळे विशिष्ट पद्धतीने ‘कावकाव’ करू लागले, ‘लाख सव्वालाखाचे धनी चालले आहेत. त्यांना लुटायचे असेल तर लवकर तुटा,’ अशा अर्थाची ती सूचक भाषा कानी पडताच, त्या भिल्लांनी त्या पाचहीजणांना एकदम गराडले, व त्यांचे कपडे काढून त्यांना कसोशीने तपासले, पण त्यांना त्यांच्यापाशी काहीच मोलाचे असे मिळाले नाही. ते पाहून म्होरक्या भिल्ल बाकीच्यांना म्हणाला, ‘आपल्या कावळ्यांचे सांगणे आजवर कधी खोटे ठरले नाही. मग आजच ते खोटे कसे ठरले ? तेव्हा या पाचहीजणांना ठार मारून यांची कातडी सोलून काढा, म्हणजे यांनी जर शरीरात सोन्याच्या चिपा किंवा रत्‍ने दडवून ठेवली असली तर ती आपल्याला मिळतील.’

भिल्लांच्या म्होरक्याचे हे शब्द ऐकून तो चोरटा ब्राह्मण मनात म्हणाला, ‘अरेरे ! मी या व्यापार्‍यांना मारून यांच्याजवळची रत्‍ने मिळवायला म्हणून आलो आणि आता ती रत्‍ने मिळवण्याऐवजी या चौघांबरोबर माझ्यावरही प्राण गमावण्याचा प्रसंग आला ! आता एवीतेवी मरण जर चुकत नाही, तर आपण या भिल्लांना केवळ ‘नमुना’ म्हणून आपल्याला मारायला सांगावे आणि आपल्या शरीरात दडवलेले सोने वा रत्‍ने न सापडल्यास या चार व्यापार्‍यांना सोडण्याबद्दल विनवावे. आपल्यामुळे जर हे व्यापारी सुटले तर निदान मरता मरता हातून एक महान् पुण्यकृत्य घडेल व आजवरचे आपले पाप धुवून निघेल.’

मनात असा विचार करून त्या चोरट्या पण सूज्ञ ब्राह्मणाने त्या भिल्लप्रमुखाला त्याप्रमाणे विनविले आणि त्याने ते अमान्य केले. मग त्या भिल्लांनी त्या ब्राह्मणाला ठार मारून, त्याच्या अंगावरचे कातडे सोलून काढले, पण त्याच्या शरीरात सोने वा रत्‍न न मिळाल्याने बाकीचे चौघेही असेच असतील, असे म्हणून त्यांनी त्या चारहीजणांना सोडून दिले.’ ही गोष्ट सांगून करटक दमनकाला म्हणाला, ‘म्हणून मी म्हणतो की, मूर्ख मित्रापेक्षा सूज्ञ फार बरा.’

दमनक म्हणाला, ‘दादा, तुझं तत्त्वज्ञान तू तुझ्यापाशी सांभाळून ठेव. सध्याचे जग हे असे सरळ वागणार्‍यांसाठी नाही.’ असे बोलता बोलताच, तिकडे पिंगलकाकडून ठार झालेल्या संजीवकाकडे लक्ष वेधवून दमनक करटकाला पुढं म्हणाला, ‘ते बघ, माझे कारस्थान फळाला आले. पिंगलकमहाराजांनी संजीवकाला ठार मारले. माझ्याशी कधीही शत्रुत्व न करणार्‍या, पण माझे महत्त्व कमी व्हायला कारणीभूत होणार्‍या त्या संजीवकाचा अंत झाला असल्याने, आता मी महाराजांचा प्रधान होणार आणि अमर्याद वैभव व सत्ता उपभोगणार.’

तिकडे संजीवकाच्या प्रेताकडे पाहात पिंगलक अश्रु ढाळीत म्हणत होता, ‘अरेरे ! झाले हे फार वाईट झाले. देशाचा एखादा भाग दुसर्‍या राजाने घेतला तर तो परत जिंकून घेता येतो, पण निष्ठावंत व बुधिमान् सेवक मेल्याने, राजा त्याला कायमचा मुकतो. बाकी संजीवकाची आता आपल्या ठिकाणी निष्ठा कुठे राहिली होती ? पण याला पुरावा काय ? आपण तर त्याचे म्हणणे ऐकून न घेताच त्याचा प्राण घेतला. म्हणजे आपण मित्राचा विश्वासघातच केला म्हणायचा ! आणि मित्राचा विश्वासघात करणारा तर महापापी मानला जातो. म्हटलंच आहे ना ?-

मित्रद्रोही कृतघ्नश्च यश्च विश्वासघातकः ।

ते नरा नरकं यान्ति यावच्चन्द्रदिवाकरौ ॥

(मित्रद्रोही, कृतघ्न आणि विश्वासघातकी जे असतात, ते चंद्रसूर्य असेपर्यंत नरकाचे धनी होतात.)

पिंगलक याप्रमाणे दुःख करीत असता त्याच्यापाशी जाऊन दमनक म्हणाला, ‘महाराज, केलेल्या कृतीबद्दल असा पश्चात्ताप वा दुःख करीत बसणे राजाला शोभून दिसत नाही. त्यातून संजीवक हा तर आपल्या जिवावर उठला होता, हे मी त्याच्यासमक्ष आपल्याला सांगितले आहे. मग त्याला मारण्यात आपली चूक ती काय ? कारण शास्त्रच मुळी सांगतं-

पिता वा यदि वा भ्राता पुत्रो भार्याऽथवा सुह्रद् ।

प्राणद्रोहं यदा गच्छेत् हन्तव्यो नास्ति पातकम् ॥

(बाप असो वा भाऊ, मुलगा, पत्‍नी किंवा मित्र असो, जो आपल्या जिवावर उठतो, त्याला दुसरा पर्याय नसल्यास ठार मारण्यात पाप नाही.)

दमनक पुढे म्हणाला, ‘महाराज, ज्याला राज्य चालवायचं आहे, त्याला एवढे हळवे व सोवळे राहून चालत नाही. ही राजनीती काही एखाद्या कुलवती स्त्रीप्रमाणे चारित्र्याला जपणारी नाही. ती कशी आहे ते ऐकायचं आहे ? ऐका -

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च

हिंस्त्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या ।

भूरिव्यया प्रचुरवित्तसमागम च

वेश्याङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा ॥

(कधी खरे बोलणारी, तर कधी खोटे बोलणारी, कधी कठोरभाषा तर कधी मधुभाषी, कधी घातक तर कधी दयाळू, कधी अप्पलपोटी तर कधी दानशूर, कधी जास्तीतजास्त पैशांचा सांभाळ करणारी तर कधी जास्त खर्च करणारी, अशी ही राजनीती एखाद्या वेश्येप्रमाणे नाना रूपे घेणारी आहे.)

दमनकाचा हा प्रभावी उपदेश ऐकून पिंगलकाने आपले दुःख आवरले आणि प्रधान व्हायला तूच योग्य आहेस,’ असे म्हणून त्याला आपला प्रधान नेमले.

मित्रभेद

पंचतंत्र-गोष्ट बावीसावी

मूर्खाला काम सांगावे व स्वतःवर संकट ओढवून घ्यावे.

‘एका राजापाशी एक भलेमोठे वानर होते. त्याच्यावर त्याचा अतिशय जीव असल्यामुळे तो जिथे जाई, तिथे त्याला आपल्यासंगे नेई. एकदा दुपारच्या जेवणानंतर राजा झोपला असता, ते वानर त्याला पंख्याने वारा घालू लागले. तेवढ्यात एक माशी आली व राजाच्या छातीवर बसली.

‘त्या वानराने तिला हाकलून द्यावे व तिने पुन्हा लगेच त्याच्या छातीवर येऊन बसावे, असे अनेक वेळा झाल्यावर, ते वानर तिच्यावर भलतेच चिडले. त्याने त्या माशीला ठार मारण्यासाठी जवळच असलेली नंगीतलवार हाती घेऊन, तिच्यावर एवढ्या जोराने प्रहार केला की, त्या एका घावासरशी त्या राजाचे दोन तुकडे झाले ! म्हणून ज्याला बरेच दिवस जगायचे असेल, त्याने मूर्खांच्या सहवासात कधीही राहू नये.

‘दमनका, माझे तर ठाम मत आहे की, एक वेळ सुज्ञ शत्रू परवडला, पण मूर्ख अशा मित्राच्याच नव्हे, तर भावाच्याही वार्‍याला उभे राहू नये. ज्याने परक्या व्यापार्‍यांचे प्राण वाचविण्यासाठी आत्मबलिदान केले, त्या चोरट्या पण सूज्ञ ब्राह्मणाची गोष्ट माझ्या विधानाला पुष्टी देणारी आहे.’

‘ती गोष्ट काय आहे बुवा?’ असा प्रश्न दमनकाने मोठ्या उत्कंठाने विचारला असता करटक म्हणाला, ‘त्याचं असं झालं-

मित्रभेद

पंचतंत्र-गोष्ट एकवीसावी

ही देवाची योजना आहे, ‘शेर आहे तिथे सव्वाशेर’ ही आहे.

एका गावात ‘जीर्णधन’ नावाचा एक वैश्यपुत्र होता. व्यापारात जबरदस्त खोट खाल्ल्यामुळे त्याला अतिशय वाईट दिवस आले, म्हणून तशा स्थितीत त्याला त्या गावात राहणे लाजिरवाणे वाटु लागले व त्याने काही काळाकरिता बाहेरगावी जायचे ठरविले.

यत्र देशेऽथवा स्थाने भोगान् भुक्त्वा स्ववीर्यतः ।

तस्मिन् विभवहीनो यो वसेत् स पुरुषाधमः ॥

(ज्या देशात वा ठिकाणी ज्याने स्वतःच्या हिंमतीवर वैभव भोगले, तिथे जो वैभवहीन झाल्यावरही राहातो, तो पुरुष सर्वात अधम असतो.)

त्याचप्रमाणे -

येनाहङ्कारयुक्तेन चिरं विलसितं पुरा ।

दिनं वदति तत्रैव यः परेषां स निन्दितः ॥

(ज्याने एखाद्या ठिकाणी पूर्वी अभिमानाने विलास व चैन आस्वादण्यात बराच काळ घालविला, तो जर नंतर त्याच ठिकाणी लाचारीने बोलू लागला, तर दुसर्‍यांच्या निंदेचा विषय बनतो.)

म्हणून त्या वैश्यपुत्राने घरात असलेला वडिलोपार्जित असा एक मोठा वजनदार लोखंडी तराजू, एका व्यापार्‍याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिला आणि मग तो दूरच्या प्रदेशात निघून गेला.

चार-सहा वर्षांनंतर, थोडीफार कमाई केल्यावर, जेव्हा तो आपल्या गावी परतला व त्या व्यापार्‍याकडे जाऊन आपला तराजू मागू लागला, तेव्हा तो व्यापारी त्याला म्हणाला, ‘तू माझ्याकडे ठेवायला दिलेला लोखंडी तराजू उंदराने कुरतडून कुरतडून खाल्ला व पार संपवून टाकला. मग आता तो तराजू मी तुला कसा काय परत करणार ?’ शेटजीचे हे उत्तर ऐकून तो वैश्यपुत्र समजूत झाल्याप्रमाणे गप्प बसला. त्यामुळे तो लबाड व्यापारी स्वतःच्या चातुर्यावर खूष झाला. त्या वैश्यपुत्राने – म्हणजे जीर्णधनाने त्या शेटजींशी पूर्वीपेक्षाही अधिक स्नेहाचे संबंध ठेवले, त्यांच्याकडे जाणे येणे चालू ठेवले, पण मनात मात्र त्याला धडा शिकविण्याचे ठरविले.

जीर्णधनाचे ते वाजवीपेक्षाही अधिक प्रेमाचे वागणे पाहून त्या शेटजीच्या मनात मधूनच विचार येई, ‘हा आपल्याशी इतका प्रेमाने का बरं वागतो ? याच्या मनात तराजूच्या बदल्यात आपल्याकडून काही उकळावयाचे तर नसेल ना ? कारण कुणीही कुणाशी विनाकारण चांगला वागत नसतो. म्हटलंच आहे ना ?

न भक्त्या कस्यचित् कोऽपि प्रियं प्रकुरुते नरः ।

मुक्त्वा भयं प्रलोभं वा कार्यकारणमेव वा ॥

(केवळ प्रेमापोटी कुणी कुणाचे हित करायला जात नाही. त्यामागे भीती, लोभ किंवा असेही काही खास कारण असते.)

त्याचप्रमाणे -

अत्यादरो भवेत् यत्र कार्यकारणवर्जितः ।

तत्र शङ्का प्रकर्तव्या परिणामेऽसुखावहा ॥

(जिथे कारण नसतानाही अतिशय आदर दाखविला जातो, तिथे शंका घ्यावी; नाहीतर परिणाम दुःखद होतो.)

एके दिवशी तो जीर्णधन, त्या लबाड शेटजीच्या घरावरून आंघोळीसाठी नदीवर जात असता, त्या शेटजीचा लहान मुलगा त्याच्या पाठीशी लागला व शेटजीने संमती दिल्यामुळे जीर्णधन त्या मुलाला घेऊन गेला. मात्र दोघांच्या आंघोळी झाल्यावर जीर्णधनाने त्या मुलाला त्याच्या घरी पोहोचते करण्याऐवजी त्याला एका अज्ञात स्थळी लपवून ठेवले. बराच वेळ झाला तरी आपला मुलगा घरी परत न आल्याचे पाहून, तो शेटजी जीर्णधनाकडे गेला व ‘माझा मुलगा कुठे आहे?’ असे त्याला विचारू लागला. ‘तुझ्या मुलाला मी नदीवर आंघोळ घालत असता तिथे एक बहिरीससाणा आला व तुझ्या मुलाची मान चोचीत पकडून दूर उडून गेला,’ असे उत्तर जीर्णधनाने मुद्दाम दिले तेव्हा त्या शेटजीने त्याच्याविरुद्ध न्यायालयात दावा केला.

न्यायाधीशाने विचारले, ‘जीर्णधना, ससाण्यासारखा छोटासा पक्षी, शेटजींच्या पाच-सहा वर्षांच्या मुलाची मान चोचीत पकडून दूर उडून जाणे शक्य आहे का?’

जीर्णधनाने उत्तर दिले, ‘का शक्य नाही ? चार-सहा वर्षांपूर्वी मी बाहेरगावी जाताना, याच शेटजींकडे ठेवायला दिलेला बर्‍याच शेर वजनाचा लोखंडी तराजू जर याच्याकडला एक यःकश्चित् उंदीर कुरतडून खलास करू शकला, तर नदीवर आलेला तो बलदंड ससाणा याच्या मुलाची मानगूट चोचीत पकडून उडून जाण्यात यशस्वी झाला, यात अशक्य ते काय ?’ त्याच्या या बोलण्याने तो न्यायाधीश त्याच्याकडे अचंबित नजरेने पाहू लागताच जीर्णधनाने पूर्वीच्या तराजू-प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत त्याला सांगितला. त्याबरोबर न्यायाधीश खदखदून हसला. मग त्याने त्या लबाड व्यापार्‍याला फैलावर घेतले आणि तो मुलगा व तो तराजू ज्याचा त्याला परत करण्याचे त्या दोघांना हुकूम फर्मावले.’

ही गोष्ट सांगून करटक दमनकाला म्हणाला, ‘तुला स्वतःच्या बुद्धीचा जसा वाजवीपेक्षा अधिक अभिमान वाटू लागला आहे, तसाच त्या संजीवकाचा उत्कर्षही सहन होईनासा झाला आहे. म्हटलंच आहे ना ?

मूर्खाणां पण्डिता द्वेष्या निर्धनानां महाधनाः ।

व्रतिनः पापशीलनामसतीनां कुलस्त्रियः ॥

(पंडितांचा द्वेष किंवा हेवा मूर्ख लोक करतात, धनहीन धनवंताचा, पापी व्रतस्थांचा तर दुराचारी स्त्रिया कुलवान स्त्रियांचा करतात. )

‘हे दमनका, स्वतःला शहाणा समजणार्‍याएवढा मूर्ख या जगात दुसरा कुणी नसतो. तू तसाच असल्यामुळे, तुझ्याशी प्रेमाचे संबंध ठेवल्याने, मूर्ख वानराशी मैत्री जोडल्यामुळे एका राजावर जसा मरणाचा प्रसंग ओढवला, तसा प्रसंग माझ्यावर ओढवेल.’

‘राजाची व वानराची ती गोष्ट काय आहे?’ असे दमनकाने विचारले असता करटक म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वीची गोष्ट -

Incoming search terms:

  • पंचतंत्र - तराजु आणि
मित्रभेद

पंचतंत्र-गोष्ट वीसावी

अविचाराने करता उपाय, कालांतराने ठेर अपाय

एका वनातील वडाच्या झाडावर बरेच बगळे घरटी करून राहात होते. त्याच झाडाच्या ढोलीत एक भलामोठा काळाकुट्ट सर्प राहात असे व ते बगळे भक्ष्याच्या शोधार्थ दूरवर गेले की, त्यांच्या घरट्यातील पिले खाऊन टाकत असे.

एकदा अशीच त्या सर्पाने एका बगळाबगळीची पिले खाऊन टाकल्यामुळे तो बगळा जवळच्याच एका सरोवराकाठी जाऊन रडत बसला. एका खेकड्याने त्याला रडण्याचे कारण विचारता, त्याने ते त्याला सांगितले व ‘त्या दुष्ट सर्पाला मारण्याचा एखादा उपाय सांगतोस का?’ असे त्याला विचारले.

त्याचे ते म्हणणे ऐकून खेकडा मनात म्हणाला, ‘जसा तो साप या बगळ्यांच्या पिल्लांचा शत्रू, तसेच झाडून सारे बगळेही आम्हा खेकड्यांचे व माशांचे शत्रूच आहेत. मग आलेली संधी साधून, आपण जर गोड बोलून या बगळ्यांचा परस्पर कुणाकडून तरी नाश करविला, तर त्यात वावगे ते काय ? म्हटलेच आहे ना ?

नवनीतसमां वाणीं कृत्वा चित्तं तु निर्दयम् ।

तथा प्रबोध्यते शत्रुः सान्वयो म्रियते यथा ॥

(वाचा लोण्याप्रमाणे मृदु, पण ह्रदय मात्र कठोर ठेवून शत्रूला असा सल्ला द्यावा, की ज्यायोगे त्याचा गणगोतासह नाश होईल.)

मनात आलेला हा विचार पक्का करून तो खेकडा म्हणाला, ‘बगळेमामा, यावर एक नामी उपाय तुम्हाला म्हणून मी सांगतो. त्या समोरच्या झाडाखाली असलेल्या बिळात मुंगूस राहतो ना ? त्याच्या बिळापासून ते थेट तुमच्या वटवृक्षातील ढोलीपर्यंत थोडथोड्या अंतरावर मांसखंड टाका; म्हणजे तो मुंगूस त्याच्या बिळापासून एकेक मांसखंड खात खात अखेर त्या ढोलीपर्यंत जाईल व त्या सर्पाला मारून खाईल.’

खेकड्याने सुचविलेला हा उपाय एकदम पटल्यामुळे त्या बगळ्याने त्याप्रमाणे केले. पण हा उपाय जरी परिणामकारक ठरला, तरी त्या मुंगुसाने ते मांसखंड खात खात जाऊन जसा त्या सर्पाचा फडशा उडविला, तसाच त्यानंतर त्याची दृष्टी त्या वृक्षावर गेल्यामुळे, त्याने त्या वृक्षावरील सर्व बगळ्यांचाही क्रमाक्रमाने फडशा उडविला.’

ही गोष्ट सांगून तो न्यायाधीश म्हणाला, ‘हे धर्मबुद्धी ! म्हणून मी म्हणतो की, ज्याप्रमाणे पूर्ण विचार न केल्यामुळे त्या बगळ्याने योजलेला उपाय हा अपाय ठरला, त्याचप्रमाणे पापबुद्धीनेही तुझे धन गडप करण्यासाठी उपाय योजताना, त्यापासून होणार्‍या अपायाचा विचार न केल्यामुळे, तो स्वतः तर प्राणास मुकलाच, पण त्याचा पिताही आंधळा झाला.’

या गोष्टी सांगून करटक दमनकाला म्हणाला, ‘बाबा रे, स्वार्थापुढे तुला न्यायनीतीची चाड उरली नसल्याने, तू पिंगलकमहाराजांचे प्राण व राज्य धोक्यात आणले आहेस. आज त्यांना दगा देऊ पहाणारा तू, उद्या मलाही दगा द्यायला कमी करणार नाहीस. अशा स्थितीत तुझी संगत सोडून देणेच योग्य होईल. ज्याने न्याय व नीती गुंडाळून ठेवली आहे, अशा तुला आज जरी यश मिळत असल्यासारखे वाटत असले, तरी ते यापुढेही असेच मिळत राहील, या भ्रमात तू राहू नकोस. ज्या गावात शेकडो शेर वजनाचा लोखंडी तराजू खाणारा उंदीर असतो, त्या गावात – त्या उंदरास तोडीस तोड असा – चोचीने मुलगा उचलून उडून जाऊ शकणारा बहिरीससाणाही असतो, ही गोष्ट तुला ठाऊक आहे ना?’

‘ती गोष्ट मला ठाऊक नाही, ‘असे दमनक म्हणताच करटकाने त्याला ती गोष्ट सांगायला सुरुवात केली -

Incoming search terms:

  • पैशाचा हाव KaTHA