काकोलूकीय

पंचतंत्र-गोष्ट सत्तेचाळिसावी

वाट्टेल ते सोंग घ्यावे, पण दुष्टांना निपटून काढावे.

एका गावी राहणार्‍या ‘यज्ञदत्त’ नावाच्या ब्राह्मणाची बायको दुराचारी होती. ती स्वतःच्या नवर्‍याला अगदी साधे अन्न खायला घाली आणि उत्तमोत्तम पक्वान्ने करून, स्वतः मात्र, गावाबाहेरच्या देवीच्या देवळात नेऊन तिथे भेटणार्‍या आपल्या प्रियकराला खाऊ घाली. त्यामुळे यज्ञदत्ताची प्रकृती खालावू लागली. परंतु एके दिवशी त्याला बायकोच्या चालचलणूकीची माहिती मिळाली.

मग दुसर्‍याच दिवशी, बायकोच्या नकळत तो त्या देवळात गेला व देवीच्या मूर्तीआड दडून बसला. थोड्याच वेळात पक्वान्नाने भरलेल्या ताटासह, त्याची बायको त्या देवळात आली व त्याचा नैवेद्य दाखवून म्हणाली, ‘देवी, माझ्या प्रियकराला माझ्या घरी राजरोस येता यावे, म्हणून माझ्या नवर्‍याला आंधळा कर.’

देवीच्या मूर्तीआड दडलेला यज्ञदत्त बायकी आवाजात म्हणाला, ‘हे माझ्या भक्तिणी, तू तुझ्या नवर्‍याला दररोज भरपूर तूप व तुपातले पदार्थ खायला घाल म्हणजे थोड्याच दिवसांत तो आंधळा होईल.’ देवीचीच ही वाणी आहेसे वाटून त्या कुलटेला अतिशय आनंद झाला. त्या आनंदात ती प्रियकराची वाट पाहू लागली असता, यज्ञदत्त लपत छपत परस्पर मागल्या बाजूने निघून गेला व दुरून त्या देवळाकडे बघू लागला. थोड्याच वेळात त्या बाईचा प्रियकर आला आणि तिने दिलेले पक्वान्न खाऊन व तिच्याशी गुजगोष्टी करून निघून गेला.

नवरा लवकरात लवकर आंधळा व्हावा, म्हणून ती बाई, त्याला भरपूर तूप व तुपातले पदार्थ खायला घालू लागली. त्यामुळे त्याची प्रकृती सुधारू लागली. पण त्याचबरोबर त्याने ‘आपल्याला कमी दिसू लागले आहे,’ अशी खोटीच कुरबूर सुरू केली. त्यामुळे ‘देव’च्या सांगण्यावार तिची श्रद्धा जडली. असा एक महिना निघून गेला आणि एके दिवशी सकाळी अंथरुणातून उठता उठताच यज्ञदत्त खोटेच ओरडला, ‘अगं, मला बिलकूल दिसत नाही !’

आता आपला नवरा पूर्ण आंधळा झाला, असे वाटून त्या निर्लज्ज बाईने आपल्या प्रियकराला घरी बोलावले व त्याच्याशी प्रेमाचे चाळे सुरू केले. ती दोघे त्यात रमली असता, आता केवळ डोळसच नव्हे, तर दणकट झालेल्या यज्ञदत्ताने, हाती काठी घेऊन त्या बायकोच्या प्रियकराला मरेमरेसे मारले आणि बायकोचे नाक कापून तिला घरातून हाकलून दिले.

ही गोष्ट आपल्या मित्राला सांगून मंदवीष सर्प पुढे म्हणाला, ‘बाबा रे, ब्राह्मणाच्या मुलाला चावल्यामुळे त्याच्या बापाने मला शाप दिला, वगैरेसारखी थाप मारून, मी जो बेडकांच्या राजाला व त्याच्या मंत्र्यांना पाठीवरून फिरवतो आहे, ते मला दररोज पोटीपोटभर बेडुक खायला मिळावे म्हणून. अद्यापपर्यंत लहान बेडूक तर मी खाऊन संपविले. आता मोठ्यांना खात आहे. माझी तब्येत आणखी सुधारली की, मी त्या राजालाही त्याच्या मंत्र्यांसकट खाऊन टाकीन.’ आणि मंदवीष जसे म्हणाला, तसेच त्याने पुढे केले.

या गोष्टी राजा मेघवर्णाला सांगून स्थिरजीवी त्याला म्हणाला, ‘महाराज, काम साधण्यासाठी शत्रूला डोक्यावर घ्यावे, पण काम साधले जाताच त्याला नाहीसे करावे. युद्धे जिंकण्यासाठी शस्त्रांपेक्षाही बर्‍याच वेळा युक्ती व बुद्धी उपयोगी पडतात.’

स्थिरजीवीचे हे विचार ऐकून राजा मेघवर्ण म्हणाला, ‘काका, तुमचे किती गुणगान गाऊ? बाकी तुम्ही हाती घेतलेलं काम तडीस नेणार याबद्दल मलाही खात्री होती. कारण म्हटलंच आहे,

प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः

प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः ।

विघ्नैः सहस्त्रगुणितैरपि हन्यमानाः

प्रारब्धमुत्तमगुणा न परित्यजन्ति ॥

(जे क्षुद्र असतात, ते विघ्ने आडवी येतील या भयाने कामालाच सुरुवात करीत नाहीत. मध्यम दर्जाचे लोक, विघ्ने आल्यावर हतबल होऊन, घेतलेले काम अर्धवट सोडून देतात. तर जे उत्तम दर्जाचे असतात, त्यांना जरी हजारो संकटांनी बेजार केले, तरी ते हाती घेतलेले काम मधेच सोडून देत नाहीत.)

राजा मेघवर्ण शेवटी म्हणाला, ‘काका, ऋण, अग्नी, शत्रू व रोग यांना अगदी मुळापासून निपटून काढावे, अशी जी उक्ती आहे, ती कृतीत आणून तुम्ही मला व प्रजाजनांना भयमुक्त केले आहे.’

यावर स्थिरजीवी म्हणाल, ‘महाराज, राज्य हे पूर्णपणे भयमुक्त कधीच नसते. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. स्वतःच्या हितापेक्षा प्रजेचे हित सदैव डोळ्यांपुढे ठेवा. या राज्याचा आपण व आपल्या पुत्रपौत्रांनी अनंत काळपर्यंत उपभोग घ्यावा अशीच आम्हा सर्वांची मनोमन इच्छा आहे.’

Incoming search terms:

  • मराठी बाल कथा
  • गोष्टी मराठी पंचतंत्र
  • मराठी भूतां च्या गोष्टी
काकोलूकीय

पंचतंत्र-गोष्ट सेहेचाळिसावी

मूर्ख फसती, आणि त्यांच्या जिवावर धूर्त मजा मारती.

वरुण पर्वतालगतच्या प्रदेशात राहणारा मंदवीष नावाचा साप, जवळच्याच एका सरोवरातले बेडूक मारून, त्यावर आपला चरितार्थ चालवीत होता. पण वाढत्या वयाबरोबर त्याच्य अंगची चपळता कमी झाली आणि त्याला बेडूक पकडता येईनासे झाल्याने, त्याची उपासमार होऊ लागली. म्हणून त्याने बेडूक आयते मिळविण्याची एक युक्ती शोधून काढली.

एकदा तो त्या सरोवराच्या काठी दुःखी चेहेर्‍याने बसला. त्याबरोबर एका बेडर बेडकाने त्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा मंदवीष सर्प दुःखाचा सुस्कारा सोडून म्हणाला, ‘बाबा रे. काल नदीवर स्नानाला गेलेल्या एका ब्राह्मणकुमाराला दंश करून मी त्याचा प्राण घेतला, म्हणून त्या मुलाच्या पित्याने ‘तू यापुढे बेडकांचे वाहन होशील व त्यांना पाठीवर घेऊन पाण्यात फिरत राहशील.’ असा मला शाप दिला. म्हणून तुम्हाला पाठीवर घेऊन या सरोवरात संचार करण्याकरिता मी इकडे आलो आहे.’

त्या बेडकाने ही गोष्ट त्याच तळ्यात राहणार्‍या आपल्या राजाच्या कानी घालताच तो राजा आपल्या मंत्र्यांसह त्या सर्पाच्या पाठीवर बसला आणि तो सर्प त्यांना त्या तळ्यात फिरवू लागला. दोन दिवस याप्रमाणे फिरवून झाल्यावर, तिसर्‍या दिवशी तो सर्प त्या बेडकांना पाठीवर घेऊन त्या सरोवरात अत्यंत मंदगतीने संचार करू लागला. बेडकांच्या राजाने त्या सर्पाला त्याची गती मंदावण्याचे कारण विचारता, तो त्या बेडकांच्या राजाला म्हणाला, ‘महाराज, गेल्या दोन दिवसात पोटात अन्नाचा कण गेला नसल्याने, आपल्याला पाठीवर घेऊन पाण्यात घिरट्या घालण्याची माझ्यात ताकदच उरली नाही.’ हे त्याचे उत्तर ऐकून त्याच्या पाठीवर बसून पाण्यात विहार करण्याची चटक लागलेला तो बेडूकराजा त्या सर्पाला दररोज तीन चार बारीक बेडूक खाण्यासाठी देऊ लागला. त्यामुळे त्या सर्पाची प्रकृती सुधारू लागली.

एके दिवश त्या बेडूकराजाला व त्याच्या मंत्र्यांना काही वेळ पाठीवरून त्या तळ्यात फिरवून व त्याने दिलेले तीन-चार बेडूक स्वाहा करून, तो मंदवीष सर्प आपल्या वारुळाकडे चालला असता, तो प्रकार पाहिलेल्या एका ओळखीतल्या सर्पाने त्याला विचारले, ‘मंदवीषमामा, तुमच्यासारख्या प्रतिष्ठित सर्पाने त्या क्षुद्र बेडकांना पाठीवर घेऊन त्या सरोवरात फिरत राहणे योग्य आहे का?’

यावर तो मंदवीष सर्प म्हणाला, ‘बाबा रे, आपली कामे साधण्यासाठी वाट्टेल ती सोंग आणून मूर्खांना फसवावे लागते. म्हणून तर त्या यज्ञदत्त ब्राह्मणाने तूप खाऊन आंधळे झाल्याचे सोंग आणले ना?’

तेव्हा, ‘ती गोष्ट काय आहे?’ अशी त्या दुसर्‍या सर्पाने पृच्छा केली असता, मंदवीष त्याला ती गोष्ट सांगू लागली-

काकोलूकीय

पंचतंत्र-गोष्ट पंचेचाळिसावी

स्वविचाराने वागे तो शिखर चढे, परविचाराने वागे तो खड्ड्यात पडे !

भक्ष्याच्या शोधार्थ सकाळपासून वनात फिरणार्‍या ‘खरनरवर’ नावाच्या सिंहाला दिवसभरात शिकार न मिळाल्याने, तो एका पर्वतातल्या गुहेपाशी जाऊन स्वतःशीच म्हणाला, ‘आता संध्याकाळ दाटू लागल्याने, या गुहेत नेहमी राहणारा प्राणी लवकरच रात्रीच्या निवार्‍यासाठी इथे येईल व त्याला मारून आपल्याला आपली भूक भागवता येईल.’ मनात असे म्हणून तो सिंह त्या गुहेत दडून बसला.

थोड्याच वेळात, त्या गुहेत राहणारा दधिपुच्छ नावाचा एक कोल्हा त्या गुहेच्या तोडापाशी आला. आत प्रवेश करण्यापूर्वी तो इकडेतिकडे बघतो, तर त्याला केवळ गुहेच्याच दिशेने धुळीत उमटलेली सिंहाची पावले दिसली. आत सिंह आहे की काय, या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी, तो मुद्दामच त्या गुहेला उद्देशून म्हणाला, ‘बये गुहे, आज रात्री मी तुझ्या पोटात आसरा घेऊ का? अगं, दररोज संध्याकाळी जेव्हा मी तुला हा प्रश्न विचारतो तेव्हा तू मोठ्या आपुलकीने ‘ये, बाबा ये’ असे म्हणतेस. मग आजच तू अशी गप्प का ? तू जर नेहमीप्रमाणे मला ‘ये, बाबा ये,’ असे म्हणाली नाहीस तर, मी इथून निघून जाईन.’

गुहेबाहेरच्या कोल्ह्याचे ते शब्द ऐकून सिंहाला वाटले, ‘कोल्ह्याच्या त्या प्रश्नाला ही गुहा ‘ये, बाबा ये,’ असे उत्तर देत असणार, पण आज माझे भय वाटत असल्याने ही चुपचाप असावी. मग आता त्याला नेहमीचे उत्तर नाही मिळाले तर तो निघून जाईल व मजवर भुके राहण्याची पाळी येईल. तेव्हा या गुहेऐवजी मीच त्याला उत्तर देतो.’ त्या सिंहाच्या मनात याप्रमाणे विचार चालला असता, त्या कोल्ह्याने पुन्हा विचारले, ‘काय गं गुहे, आज रात्री मी तुझ्या पोटात आसरा घेऊ का?’ त्याबरोबर सिंहाने उत्तर दिले, ‘ये बाबा ये.’

गुहेतून हे शब्द बाहेर पडताच त्या सिंहाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात, तो कोल्हा म्हणाला, ‘अरेच्चा ! या गुहेत राहता राहता माझ्या काळ्यांचे पांढरे झाले, पण ही गुहा काही कधी बोलली नाही. पण ज्या अर्थी आज तिला वाचा फुटली आहे, त्या अर्थी तिच्यात जाणे धोक्याचे आहे.’ एवढे बोलून तो कोल्हा तिथून निघून गेला आणि तो सिंह स्वतःच्या मूर्खपणाबद्दल स्वतःलाच शिव्या देऊ लागला.

ही गोष्ट सांगून व या किल्ल्यात इतःपर राहणे कसे धोक्याचे आहे, हे आपल्या आप्तमित्रांना स्पष्ट करून रक्ताक्ष हा त्यांच्यासह तो किल्ला सोडून अन्यत्र कुठेतरी निघून गेला.

राजा अरिमर्दनाचा मंत्री रक्ताक्ष, त्याच्या बंधुबांधवांसह निघून गेल्याचे पाहून, स्थिरजीवी स्वतःशी म्हणाला, ‘या घुबडाच्या राज्यात एकटा रक्ताक्ष हाच काय तो खरा दूरदर्शी व राज्याचा हितचिंतक होता. पण त्याच्यावर स्वभूमी सोडून जाण्याचा प्रसंग आला. मात्र त्यामुळे या घुबडांचा निःपात करण्यात मला वाटणारा अडथळा दूर झाला. म्हटलंच आहे ना ?-

न दीर्घदर्शिनो यस्य मंत्रिणः स्युर्महीपतेः ।

क्रमायता ध्रुवं तस्य न चिरात् स्यात् परिक्षयः ॥

(त्या राजाचे मंत्री दूरदर्शी नसतात, त्याचा नाश क्रमाक्रमाने पण लवकरच होतो, हे ठरलेले असते. )

त्यानंतर दररोज सूर्योदय झाला व किल्ल्यातल्या घुबडांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला की, स्थिरजीवी हा त्या किल्ल्यातून बाहेर पडून सुक्या काटक्या शोधून आणी व किल्ल्याच्या प्रवेशदरवाजाजवळच, पण आडोशाला त्यांचा साठा करी. थोड्याच दिवसांत काटक्यांचा पुरेसा साठा होताच, तो एका भर दुपारी राजा मेघवर्णाकडे गेला व त्याच्या कानात काहीतरी सांगून परतीच्या प्रवासाला निघाला.

लगेच राजा मेघवर्ण व त्याचे अनुयायी पेटते पलिते घेऊन स्थिरजीवीमागोमाग, भर उन्हातून, पण जराही गाजावाजा न करता त्या घुबडांच्या गडाकडे आले. तिथे येताच स्थिरजीवीने अगोदरच साठवून ठेवलेल्या सुक्या काटक्या, त्या कावळ्यांनी त्या गडाच्या प्रवेशद्वारात खच्चून भरल्या व त्यांच्यात ते पेटते पलिते घुसविले. त्याबरोबर आगडोंब उसळून त्या बंदिस्त भुयारवजा गडात धूरच धूर झाला आणि त्यात त्यांचा शत्रू अरिमर्दन व त्याचे मंत्री व प्रजाजन यांचा अंत झाला.

मग परत आपल्या मूळ वटवृक्षाकडे गेल्यावर स्थिरजीवीचा गौरव करून राजा मेघवर्णाने त्याला विचारले, ‘काका, हा विजय तुम्ही कसा मिळविला?’ यावर स्थिरजीवीने आपल्या कारस्थानाचा सविस्तर तपशील सांगून शेवटी तो म्हणाला, ‘महाराज, या विजयात मी वठविलेल्या फितुरीच्य व लाचारीच्या सोंगाचा हात असला, तरी या विजयाला प्रामुख्याने त्या घुबडांच्या मूर्खपणानेच जास्त हातभार लावला. त्या कृष्णसर्पाने स्वतः कमीपणा पत्करून त्या बेडकांना जे पाठीवर फिरवले ते काय उगा फिरवले ?’

‘ती गोष्ट काय आहे ?’ असा प्रश्न मेघवर्णाने केला असता, स्थिरजीवी म्हणाला, ‘ऐका महाराज-

काकोलूकीय

पंचतंत्र-गोष्ट चव्वेचाळिसावी

जिथे राज्य मूर्खांचे, तिथे राहणे धोक्याचे.

एका पर्वतावरील वृक्षावर ‘सिंधुक’ नावाचा एक पक्षी राहात होता. त्याच्या विष्ठेतून सोन्याचा रवा पडे. एकदा त्या वृक्षाजवळून एक पारधी चालला असता, तो सिंधुक त्याच्या समक्ष शिटला. त्याच्या विष्ठेत चमकत असलेले सोने पाहून त्या पारध्याने त्याला जाळ्यात पकडले.

मग त्याला घेऊन घरी जाताना तो पारधी मनात म्हणाला, विष्ठेतून सोने देणारा पक्षी मजपाशी आहे हे वृत्त जर राजाला कळले, तर तो या पक्ष्याला तर घेऊन जाईलच, पण त्याशिवाय तो मलाही शिक्षा ठोठवील. त्यापेक्षा हा पक्षी राजाला नेऊन दिलेला बरा. मनात असे ठरवून त्याने त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य राजाला सांगून, त्याला त्याच्या हवाली केले आणि राजाने त्या सिंधुकाला एक सेवेकाकरवी पिंजर्‍यात अडकविले.

तेवढ्यात त्या राजाचा प्रधान तिथे येताच, जेव्हा राजाने त्याला त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘महाराज, पक्ष्याच्या विष्ठेतून सोने निघणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही त्या पक्ष्याला पिंजर्‍यातून मुक्त करा.’ राजाने त्याप्रमाणे करताच तो पक्षी एका उंच जागी जाऊन शिटला. त्या विष्ठेतून चमचमणारे सुवर्णकण पाहून राजा म्हणाला, ‘अरेरे ! विष्ठेतून सोने देणार्‍या या पक्ष्याला सोडून देणारा मी मूर्ख आहे !’

यावर सिंधुक पक्षी म्हणाला, ‘हे राजा, या जगात तू एकटाच काही मूर्ख नाहीस. पारध्याच्या समोर सुवर्णभरित विष्ठा शिटलो तर तो आपल्याला पकडील ही गोष्ट कळत असूनही, मी त्याच्या समक्ष शिटलो व स्वतःहून त्याच्या जाळ्यात सापडलो. तेव्हा तुझ्याप्रमाणे मीही एक मूर्खच आहे. आणि तो पारधी ? विष्ठेतून सुवर्ण देणार्‍या मला पाळून स्वतः श्रीमंत होण्याऐवजी त्याने मला तुझ्या स्वाधीन केले ! तेव्हा तुझ्या-माझ्याप्रमाणे तो पारधीही मूर्खच ! थोडक्यात सांगायचे तर या जगात शहाणे थोडे. सगळीकडे मूर्खांचाच बाजार !’ एवढे बोलला आणि तो पक्षी उडून गेला.

ही गोष्ट आपल्या आप्त संबंधितांना सांगून रक्ताक्ष म्हणाला, ‘जो हा आपला किल्ला आजवर आपले रक्षण करू शकत होता, त्याच किल्ल्यात आता आपल्या राजाने व त्याच्या तोंडपुंज्या मंत्र्यांनी स्थिरजीवीसारख्या शत्रूला आणून ठेवल्याने, यापुढे इथे राहाणार्‍यांवर केव्हा प्राणसंकट येईल याचा भरंवसा देता येत नाही. म्हणून मी व तुम्ही इथून दूरच्या एखाद्या सुरक्षित स्थळी राहायला जाऊ या. ‘गुहा कधी बोलत नाही’ हे त्या चतुर कोल्ह्याने हेरले म्हणूनच त्याचे प्राण वाचले ना ?’

रक्ताक्षाने याप्रमाणे विचारताच, ‘ती गोष्ट काय आहे ?’ असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांनी केला. तेव्हा तो म्हणाला, ‘एकदा असं झालं-

काकोलूकीय

पंचतंत्र-गोष्ट त्रेचाळीसावी

परजातीचा महानही लहान भासे, तर स्वजातीचा लहानही महान दिसे.

याज्ञवल्यमुनी नित्याप्रमाणे एकदा गंगेत स्नान करीत असता, त्यांना ससाण्याच्या तोंडातून गंगेच्या पात्रात एक उंदराचे पिल्लू पडलेले दिसले. या पिल्लाला एखादा मोठा मासा गिळंकृत करील, त्या भयाने त्यांनी त्याला दयेपोटी उचलून आपल्या आश्रमात नेले व मंत्रसामर्थ्याने त्याचे एका लहानग्या मुलीत रूपांतर करून, तिचे लालनपालन सुरू केले. ती मुलगी जेव्हा वयात आली, तेव्हा याज्ञवल्क्यांची पत्‍नी त्यांना म्हणाली, ‘नाथ, आपली मुलगी विवाहयोग्य झाली असता, तिच्यासाठी योग्य स्थळं शोधून का काढत नाही ?’ यावर मुनिवर्य म्हणाले, ‘अगं, तोच विचार मी करू लागलो आहे. पण मुलीसाठी स्थळ पाहताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. म्हटलंच आहे -

कुलं च शीलं च सनाथता च विद्या च वित्तं च वपुर्वयश्च ।

एतान् गुणान् सप्त विचिन्त्य देया कन्या बुधैः शेषमचिन्तनीयम् ॥

(कुल, शील, वडीलधार्‍यांचा आधार, विद्या, धन, निकोप शरीरयष्टी व वय, या सात गोष्टी विचारात घेऊन सूज्ञांनी मुलगी द्यावी, बाकी गोष्टी विचारात घेतल्या नाहीत तरी चालेल.)

याप्रमाणे बोलणे झाल्यावर एके दिवशी सूर्याला देवरूपात आश्रमामधे आणून याज्ञवल्क्य मुनींनी त्या मुलीला विचारले, ‘बेटी, हा तेजस्वी भगवान्‌ आदित्य तुला नवरा म्हणून पसंत आहे का?’ ती मुलगी नाक उडवीत म्हणाली, ‘हा रागीट दिसतो. याच्यापेक्षा श्रेष्ठ नोवरा मला हवा.’

मग मेघराजाला आश्रमात आणून मुनीवर्यांनी तिला विचारले, ‘बेटी, त्या तेजस्वी आदित्याला झाकून टाकण्याचे सामर्थ्य असलेला हा मेघराज तरी तुला पसंत आहे का?’ कपाळावर आठ्यांचे जाळे पसरून ती म्हणाली, ‘छे ! हा सावळा आहे.’

मग वायुदेवाला समोर उभे करून मुनिराज त्या मुलीला म्हणाले, ‘बेटी, मागल्या वेळी जो तुला दाखविला, त्या मेघराजाला कुठल्याकुठे उडवून देण्याचे सामर्थ्य असलेला हा वायुदेव तरी तुझ्या मनात भरतो का?’ तोंडाचा चंबू करीत ती मुलगी म्हणाली, ‘छे छे ! असला चंचल नोवरा सदान्‍ कदा फिरत राहणार, माझ्या नवर्‍यानं सदैव माझ्याजवळ राहून, माझ्या रूपागुणांचं कौतुक केलं पाहिजे. शिवाय तो या वायुदेवापेक्षाही सामर्थ्यवान्‌ असावा.’

ते ऐकून वायुदेव मिष्किलपणे म्हणाला, ‘मुनिराज, हिच्या दृष्टीने पर्वतराज हाच तिला योग्य वर ठरेल. एकतर त्याला एकाच जागी बसून राहाण्याची आवड आहे आणि दुसरे म्हणजे मलाही रोखून धरण्याचे सामर्थ्य त्याच्यात असल्याने, तो माझ्यापेक्षा सामर्थ्यवान आहे.’

पण पर्वताकडे तिला नेताच, ‘हा तर नुसताच बसून राहणारा आहे. हा मला नको. माझा पती मला इकडेतिकडे फिरवणारा, पण या पर्वतापेक्षा सामर्थ्यवान असा हवा आहे.’ असे ती म्हणताच पर्वत आतून थट्टेने पण बाहेरून गंभीरपणे म्हणाला, ‘मुनिराज, त्या दृष्टीने उंदीर हा हिला योग्य वर ठरेल. कारण तो मलाही पोखरू शकतो आणि सदैव इकडेतिकडे फिरत असतो.’ त्या पर्वताची ती सूचना ऐकून व काही झाले तरी ही मुलगी मुळची उंदरीच आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन याज्ञवल्क्यमुनींनी एका गलेलठ्ठ उंदराला बोलावले व त्या मुलीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. त्याबरोबर ती मुलगी लाजत मुरकत म्हणाली, ‘पिताश्री, हेच मला पसंत आहेत.’ मग तिला पूर्ववत् उंदीर करून याज्ञवल्क्यमुनींनी तिचे त्या उंदराशी लग्न लावून दिले.

ही गोष्ट सांगून मंत्री रक्ताक्ष म्हणाला, ‘स्वजातीकडे प्राणी असा ओढला जात असल्याने, या स्थिरजीवीचा भरंवसा देता येत नाही. म्हणून याला जिवंत ठेवणे योग्य नाही.’ पण रक्ताक्षाच्या या बोलण्याकडे राजा अरिमर्दन व त्याचे अनुयायी यांनी दुर्लक्ष केले व ते स्थिरजीवीला आपल्या किल्ल्याकडे घेऊन गेले.

त्या किल्ल्यात गेल्यावर स्थिरजीवी मनात म्हणाला, ‘माझ्या मेघवर्णराजाने मला मारल्यामुळे अंगातून अतिशय रक्त वाहून गेले व माझ्या अंगात चालण्या-उडण्याचेही त्राण उरले नाही, असे जे सोंग मी वठवले, ते खरे वाटले व म्हणून अरिमर्दन राजाने मला उचलून या किल्ल्यात आणण्यास त्याच्या सेवकांना सांगितले. अशा स्थितीत जर माझ्याकडून संशयास्पद हालचाल झाली आणि ती या घुबडांच्या ध्यानात आली तर माझ्या कार्याचा विचका उडेल. तेव्हा मी काहीतरी कारण सांगून या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी राहणे हेच योग्य.

मनात असा विचार येताच तो अरिमर्दनाला म्हणाला, ‘महाराज, आपले जरी माझ्यावर प्रेम असले, तरी आपल्या काही जातभाईंच्या डोळ्यात मी खुपत असल्याने, मला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी राहण्याची परवानगी द्या. त्यायोगे मला किल्ल्याची राखण करणेही जमेल आणि आपण प्रवेशद्वारातून जाता येता मला आपले दर्शनही सहजगत्या घडेल.’ स्थिरजीवीची ही विनंती राजा अरिमर्दनाने मान्य केली व किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी त्याची राहण्या-खाण्याची त्याने उत्तम व्यवस्था केली.

खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था झाल्याने स्थिरजीवी दिवसेंदिवस मोराप्रमाणे तुकतुकीत होऊ लागला. ते पाहून अस्वस्थ झालेला रक्ताक्ष मात्र राजा अरिमर्दनाला व इतर मंत्र्यांना म्हणाला, ‘अहो, त्या संशयास्पद व परक्या स्थिरजीवीशी अशा भोंगळ औदार्याने वागू नका, असे मी परोपरीने सांगत असतानाही तुम्ही माझे ऐकत नाही, उलट तुम्ही दिवसानुदिवस त्याला अधिकाधिक बलवान बनवीत आहात ! खरं बोलायचं तर शिटीतून सोने देणार्‍या त्या पक्ष्याच्या गोष्टीतल्याप्रमाणे मला इथेही मूर्खांचा बाजार भरल्यासारखा दिसत आहे.’ यावर त्या मंत्र्यांनी ‘ती गोष्ट काय आहे?’ असे विचारले असता रक्ताक्ष म्हणाला, ‘ऐका -

Incoming search terms:

  • पंचतंत्र गोष्टी
  • पंचतंत्र गोष्टी marathi
  • पंचतंत्र मराठी गोष्टी