इसापनीती

मधमाशी व साधी माशी

एका मधमाशीने एक साधी माशी आपल्या पोळ्याजवळ आनंदाने उडत असताना पाहून तिला रागाने विचारले, ‘तू इथे काय करतेस ? हवेतल्या राण्यांच्या संगतीत आगंतुकासारखे शिरणे तुझ्यासारखीला योग्य आहे काय ?’ यावर साधी माशी म्हणाली, ‘खरोखरच तुला राग यायला मोठे कारण घडले यात संशय नाही, तुझ्यासारख्या भांडखोर प्राण्याशी संबंध ठेवणारे वेडे असले पाहिजेत, असं मला खात्रीनं वाटतं.’ रागानं संतापलेल्या मधमाशीने विचारले, ‘असं का ? हे मला सांग बरं ! आमचे कायदे उत्तम असून आमचे राज्य जगात सर्वोत्कृष्ट धोरणावर चाललेलं आहे. आम्ही अत्यंत सुवासिक फुलांवर आमची उपजीविका करून मध तयार करण्याचं काम करतो, तो मध अमृतासारखा गोड असतो. त्याउलट तू नेहमी कुजलेल्या पदार्थांवर आपली उपजीविका करतेस.’ माशी म्हणाली, ‘आम्हाला जसं राहाता येतं तसं आम्ही राहतो, मला वाटतं की गरिबी हा काही दोष नाही, पण राग हा खात्रीने दोष आहे. तुम्ही तयार केलेला मध गोड असतो हे मला मान्य आहे, पण तुमचं अंतःकरण मात्र द्वेषानं पूर्ण कडवटलेले आहे, कारण, शत्रूवर सूड उगविण्याच्या भरात तुम्ही तुमचा स्वतःचाही नाश करून घेता व रागात तुम्ही इतका अविचारीपणा करता की शत्रूपेक्षा तुम्ही आपलं स्वतःचंच अधिक नुकसान करून घेता. बुद्धी कमी असलेली एक वेळ परवडेल, पण तिचा आपल्याला जास्त शहाणपणाने उपयोग करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवाल तर बरं होईल.’

तात्पर्य – उत्तम गुणाचा वाईट उपयोग करणारे लोक आहेत.

Incoming search terms:

  • तात्पर्य
  • इसापनीती
  • इसापनीती कथा
  • तात्पर्य katha
  • मराठी तात्पर्य कथा
इसापनीती

कोंबडी आणि कोल्हा

एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’

तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी, हे चांगले.

इसापनीती

कुत्रा आणि त्याचा मालक

एक माणूस प्रवासाला जाण्याच्या तयारीत असता, आपला कुत्रा दरवाजात उभा असलेला त्याला दिसला. तेव्हा तो त्याला म्हणाला, अरे, तू इकडे पाहात उभा काय राहिला आहेस ? माझ्याबरोबर निघण्याची तयारी कर !’ त्यावर कुत्रा त्याला म्हणाला, ‘साहेब, माझी निघण्याची अगदी तयारी झाली आहे, आता उशीर होतो आहे तो फक्त आपल्यामुळे, आपण आपलं सामानसुमान बांधलं की मी आपल्याबरोबर निघालोच.’

तात्पर्य – एका कामाचे जे निरनिराळे भाग ज्या माणसाकडे सोपविलेले असतात, त्या सर्वांनी ते ते भाग पूर्ण केले म्हणजे सगळे काम पूर्ण होते, पण एखाद्याने आपल्या कामात आळस केला की एकंदर काम अपूर्ण राहून सर्वांचीच खोटी होते.

इसापनीती

लावी पक्षीण व तिची पिले

एका शेतात एक लावी पक्षीण आपल्या पिलांसह राहात होती. जेव्हा ते शेत पिकले, तेव्हा तिला काळजी पडली की, आपल्या पिलांना पंख फुटून ती चांगली उडू लागण्याच्या पूर्वी जर शेताचा मालक शेत कापायला आला तर कसे होईल ? तेव्हापासून चारा आणण्यासाठी नेहमी बाहेर जाताना, माझ्या मागं इथं येऊन कोणी काही बोललं तर ते सगळं मी घरी आल्यावर मला सांगा.’ असं आपल्या पिलांना सांगून ती जाऊ लागली. एके दिवशी शेताचा मालक शेतावर येऊन आपल्या मुलाला म्हणाला, ‘मुला, हे शेत आता कापायला हवं असं मला वाटतं तर तू उद्या सकाळी आपल्या मित्रांना शेत कापण्यासाठी मदत करायची विनंती कर.’ संध्याकाळी लावी पक्षीण घरी येताच पिलांनी ती हकीगत तिला कळविली आणि तिच्याभोवती किलबिल करून ती म्हणाली, ‘आई, आता आम्हाला इथून लवकर दुसर्‍या ठिकाणी घेऊन जा.’ पक्षीण म्हणाली, ‘मुलांनो, काही काळजी करू नका, कारण शेताचा मालक आपले मित्र शेत कापायला येतील या विश्वासावर राहिला आहे. यावरून उद्या कापणी होत नाही याबद्दल खात्री असू द्या.’ द्सरे दिवशी पक्षीण बाहेर गेल्यावर शेताचा मालक पुन्हा शेतावर आला व मित्रांची वाट पाहात बसला. परंतु बराच वेळ गेला तरी एकही माणूस आला नाही, मग उन्ह होत आले तेव्हा तो आपल्या मुलाला म्हणाला, ‘मुला, मित्र, शेजारीपाजारी यांच्यावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही, तर तू आता आपल्या नातेवाईकांकडे जा नि शेताच्या कापणीला मदत करण्याची त्यांना विनंती कर.’ संध्याकाळी पक्षीण घरी आली तेव्हा पिलांनी ते बोलणे तिला कळविले, व तेथून दुसरीकडे जाण्याचा आग्रह केला. तेव्हा पक्षीण त्यांना म्हणाली, ‘मुलांनो, तुम्ही मला जे सांगता त्यावरून भिण्याचं काही कारण नाही. नातेवाईक येऊन यांचं शेत कापणं शक्यच नाही.’ दुसर्‍या दिवशी शेताचा मालक येऊन नातेवाईकांची वाट पाहत बसला, परंतु कोणीही आले नाही. मग तो आपल्या मुलाला म्हणाला, ‘मुला, काही हरकत नाही. या लोकांची मिजास तरी कशाला चालू द्यावी ? आपणच उद्या येऊन हे शेत कापून टाकू. तू आज दोन कोयत्यांना चांगली धार करून ठेव म्हणजे झालं.’ रात्री पक्षीण आल्यावर पिलांनी तिला सर्व सांगितले तेव्हा ती म्हणाली, मुलांनो, आता इथे राहण्यात काही अर्थ नाही कारण, जो माणूस आपलं काम आपण स्वतः करीन असं म्हणाला, तो ते काम केल्याशिवाय राहणार नाही !’ इतके बोलून तिने आपली पिलं तेथून काढून दुसर्‍या एका सुरक्षित जागी नेऊन ठेवली. दुसरे दिवशी शेताचा मालक व त्याचा मुलगा दोघांनी येऊन शेताच्या कापणीला सुरुवात केली.

तात्पर्य – जे काम स्वतःच्या हातून होण्यासारखे असेल, त्या कामी दुसर्‍याच्या मदतीवर अवलंबून राहू नये.

इसापनीती

म्हातारी आणि तिची मेंढी

एका म्हातारीची एक मेंढी होती. तिची लोकर जितकी जास्त निघेल तितकी काढावी या हेतूने ती अगदी साफ कापून काढण्याचा म्हातारी प्रयत्‍न करीत असे. तसे करताना एखादे वेळी मेंढीच्या अंगाला कात्री लागून तिला बरेच लागत असे. एके दिवशी तसा प्रकार झाला असता, ती मोठ्याने ओरडून म्हणाली, ‘अग बाई, तू माझे असे हाल का करतेस ? माझ्या अंगातून रक्त काढल्याने लोकरीत काही भर पडेल का ? तुला जर माझी लोकर हवी असेल तर लोकर कापणार्‍या धनगराला बोलाव म्हणजे माझं रक्त न निघता तो ती कापून देईल अन् जर तुला माझं मांस हवं असेल तर खाटकाला बोलाव, म्हणजे माझे असे हाल न करता तो मला आपल्या सुरीच्या एका घावात ठार मारून टाकेल !’

तात्पर्य – ज्याला एकाही कामाची पुरी माहिती नाही अशा माणसाकडून कोणतेही काम धडपणे होणे शक्य नाही, पण उलट त्याने काहीतरी नुकसान केले नाही म्हणजे मिळविली म्हणून समजावे.